पुढे लोणावळ्याहून पुन्हा दादरला येऊन राहिलो. आण्णांची तब्येत बिघडत चालली होती, त्यांना ऑक्सिजनचा सतत पुरवठा लागत असे. दादरच्या त्या एका खोलींत त्यांचं आजरपण, बाबू आणि आमची शाळा, इत्यादि. मला आधी बेबीच्या ओळखीने ओरियेंट शाळेंत घातलं. वर्गांत दुसरा नंबर येत असे. त्या खोलीतच माझी मुंजही झाली. नंतर शारदाच्या ओळखीने सरल गोठसकर (तारे) च्या वशील्याने किंग जार्ज इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश मिळाला. तिथे मात्र आभ्यास खूप जड गेला, पण शाळेच्या बँडमध्ये प्रवेश मिळाला आणि फ्रीशिपही मिळाली. मी मॅट्रिकच्या वर्गांत आलो आणि आण्णा वारले. मला पुढे शिकायची आवड नव्हती पण आक्कांच्या आणि कृष्णाच्या इच्छेला मान देऊन मी सिडनहॅम कॉलेजांत नांव घातलं. इंटरच्या वर्गांत असतांना कॉलेजच्या काँपिटिशनमध्ये पहिलं बक्षीस मिळालं. कॉलेजचा ऑर्केस्ट्रा बसवला. व्हायचं तेच झालं. इंतरला नापास झालो. आयुष्यांत प्रथम नापास झालो. कॉमटॉमीटरचा कोर्स केला. कॅंटीन स्टोर्स डिपार्टमध्ये नोकरी लागली. त्यानंतर आम्ही खारला रहायला गेलो. इंटर कॉमर्सच्या परीक्षेत दुसरा प्रयत्न यशस्वी ठरला. पुढे शिकावं कीं नाहीं यावर पुन्हा एकदा आक्कांच्या आणि कृष्णाच्या इच्छेला मान देऊन मी सिडनहॅम कॉलेजांत नांव घातलं. इंटर यूनिव्हर्सिटी यूथ फेस्टिवल मध्ये चांस लागला. दिल्लीला जाऊन आलो. आकाशवाणीच्या स्पर्धेतही चान्स मिळाला. आकाशवाणीच्या ऑडिशनमध्येही पास झालो. बी.कॉमची परीक्षा दिली आणि किलीक निक्सन मध्ये नोकरी लागली. 15 वर्षे नोकरी केली. दरम्यान बी.कॉम पास झालो. एल्.एल्.बी. पास झालो आणि एम कॉम.सुद्धा केलं अंधेरीला स्वतंत्र जागा मिळाली. रामाच्या कुटुंबाच्या सोयीकरतां तिथे राहिलो. त्यानंतर बाबूच लग्न झालं म्हणून एक वर्ष ते दांपत्य तिथे राहिलं. माझ्या लग्नानंतर मी माझ्या सौ. बरोबर तिथे राहूं लागलो. माझ्या मुलीच्या जन्मानंतर मी वकीली करावी असा आक्कांनी आणि बेबीने सल्ला दिला. माझी वकीली तशी फारशी चांगली चालली नाहीं तरी वालचंद ग्रुप मध्ये जवळ जवळ 11 वर्षे चांगल्या पगाराची नोकरी लागली. ती नोकरी सुटली. ठाकरसी ग्रुपमध्ये 2 वर्षे नोकरी केली. तीही सुटली. पुन्हा वकीलीला सुरुवात केली. जेमतेम चालली. पुढे आम्ही दोघे बेंगळूरूला येऊन स्थाईक झालो. मुलीचं लग्न झालं. तिला मुलगी झाली.
| पोर्टल निर्माता | anil sharma |
| शेवटी सुधारित | ऑगस्ट 2, 2008 2:51:48 AM IST |